Tuesday, October 20, 2015

Anokhi || अनोखी....

महत्वाचे : मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा काल्पनिक आहे!!  प्रवास वर्णन सोडून नव काही लिहिण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे!
______________________________________________
        
      “मुंगी उडाली आकाशी”, “गणपतीच्या आरत्या”, "मेहंदीच्या पानावर."..अस काही सकाळी सकाळी डोळे उघडल्यावर ऐकलं की दिवसाची सुंदर सुरुवात होते. हा अनुभव लहानपणी यायचा. घरी एक फिलिप्सचा टेप रेकॉर्डर होता, खरतर त्यानच संगीत ह्या शब्दाची ओळख करून दिली. सकाळ आत्ताही तीच आहे पण पूर्वीसारखी ती भेटत नाही. लहानाचे मोठे झालो म्हणून? अगदी खरय, वपुंच्या शब्दात एकदा बालपण हरवलं कि सुरुहोतो फक्त व्यवहार. आजकालची सकाळ (व्यवहारी) उजाडते ती घडाळ्याच्या काट्यांच गणित घेऊन. माझ्यासारख्या अनेक जणांची कमी अधिक फरकाने हीच कथा आहे. उठायचं-कसंतरी आवरायचं स्वतःला कपड्यांमध्ये घालायचं अन तयार व्हायचं रोजच्या त्याच त्या सर्कशी साठी. बॅग घ्यायची जिना उतरायचा पार्किग मध्ये येऊन गाडीला फडक मारलं तर मारलं नाही तर गाडीवर स्वार होऊन घड्याळाच्या काट्या सोबत धावयाला सुरवात करायची. त्यात मी पुण्याचा म्हणजे स्वागताला “हेमामालिनी कि गालों जैसी” सडक आणि त्या रस्त्यांवरुन गाडी चालवतानाचे असंख्य अनुभव. 


     मी जसजसा पुढे जातो तसतसं जाणवतं कि गाड्यांचे लोंढ्यांचे लोंढे रस्त्यावर येतात अन रस्ता फुगत जातो. ट्राफिक जॅमला सुरवात होते. अशातच एखाद्या रिक्षाच्या पाठीमागे अडकलो तर जीव जायची पाळी. गाड्यांमधले माझे शत्रू अशी यादी जर करायची असेल तर पहिली वर्णी लागेल रिक्षाची. कसला धूर सोडतात. अस वाटते कि सायलेन्सर चा गळा दाबावा. त्यात जर त्या रिक्षाच्या पुढे जाता येत नसेल तर?. बर ह्या साऱ्या दिव्यातून पुढे निघाल्या नंतर जरा कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळतो त्यात समोर महानगर पालिकेची कचऱ्याची गाडी दिमाखात सुगंधाची उधळण करत चाललेली असते. ह्या गाडीला पास करून पुढं जावं तर एकच भीती साला वरून वरण भात किवा दह्याचा अभिषेक तर नाहीना व्हायचा.

       हि सारी अडथळ्यांची शर्यत पार करून मी माझ्या आवडत्या वळणावर येतो. गाडी चालवताना सारे सिग्नल हिरवेच लागावेत हि प्रत्येकाची माफक इच्छा , पण मला तो सिग्नल नेहमी लाल रंगातच भेटावा अन त्याने मला तिथं काही क्षणांसाठी का होईना थांबून ठेवावं असं वाटतं अन तो हि तसाच वागतो. हा परिपाठ गेल्या ६-७ वर्षांपासून चालू आहे. ते काही सेकंद बरेच काही देऊन जातात. मी नेहमी गाडी डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्नात असतो कारण मला भेटण्यासाठी तिथं कुणीतरी असतं. सिग्नलच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एक साधारणत: १२x६ ची छोटीशी बेकरी, बऱ्याच वर्षांपासून तिथच अन तशीच आहे. साधा बोर्ड, चौकटीला चिकटून लावलेलं एक काचेच काऊनटर. काचेच्या आत बरेचशे बेकरी प्रोडक्ट्स सूत्रबद्ध पद्धतीने लावलेले अगदी छोटीशी फटहि दिसणार नाही अशा पद्धतीने. काऊंटरवरची जागाही पूर्णपणे उपयोगात आणलेली. एका बाजूला ब्रेड लावलेले एका बाजूला अंड्यांचे क्रेट्स आणि एक-दोन बिस्किटांनी भरलेल्या बरण्या. मधली जागा मोकळी तिथच आत बाहेर जाण्यासाठी दरवाजा. काऊंटरच्या पाठीमागे इकडून तिकडे जाता यावं एवढी जागा तिथेच एक स्टूल ठेवलेला. त्या पाठीमागे पूर्ण काचेचं कप्प्याकप्प्यांच कपाट तेही व्यवस्थीत लावलेलं. सारं काही जिथल्या तिथं. हे सगळं पाहून कुणालाही नक्कीच वाटेल जे कोणी हे दुकान चालवत आहे त्याच्यासाठी हे फक्त पैसे मिळवून देण्याच साधन नसून त्यापलीकडे बरेच काही आहे.
  
       हे सार वर्णन ठीक आहे, पर भाई इस्टोरी का हिरो-हिरोईन किधर है? तर काऊंटरच्या मधल्या मोकळ्या फळीवर, हात टेकून थोडं झुकलेली ती मला रोज भेटायची. वय साधारणतः ५०-५५ वर्ष असाव – काय ५०-५५ वय अन तू सरळ त्यांना “ती” म्हणून एकेरी संबोधतोयस.. त्यालाही कारण आहे. तर हा वय साधारणतः ५०-५५ वर्ष असाव. गोऱ्या रंगाला आणखी उठावदार भासवणारी डोक्यावर लाल रंगाची टिकली, काळ्या केसातून मधून मधून डोकावणाऱ्या पांढऱ्या केसांच्या बटा. तांबूस काळ्या रंगांचे डोळे. उंची साधारणतः साडेपाच फुट असावी अन त्या उंचीला साजेसा बांधा. पेहरावाचं म्हणाल तर साधाच, साधी साडी व्यवस्थीत नेसलेली खांद्यावरून पदर घेतलेला. दागिने नाही पण मंगळसूत्र दिसायचे. ह्या साऱ्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य आकर्षण काय असाव तर ते हास्य. एवढ्या वर्षात ते कधीच फिकं पडल नाही, जश्याच्या तसं टवटवीत. ते हसणं म्हणजे जणूकाही निराशेच्या ढगांना छेद देणारी आशेची वीजच! त्यात भुवया उंचावून “काय कसं चाललंय?” अस मुक्यानेच विचारण्याची लकब. गेल्या ६-७ वर्षा पासून आम्ही आमची ओळख अशीच जपली आहे. कधी कधी मी हि काहीतरी घेण्यासाठी बेकरी वर जायचो त्यावेळी एकमेकांची जुजबी चौकशी व्हायची. तर अशा पद्धतीनं त्या ( आता “त्या"? हो कारण “त्या” पासून “ती” पर्यंत चा प्रवास सांगण सोपं पडेल म्हणून ) रोज मला भेटायच्या, एकमेकांची सांकेतिक चौकशी करून मी तिथून निघून जायचो. ऑफिसला.


Thanks Nidhi for beautiful sketch 


      काही व्यक्तिमत्व अशी असतात कि ती सहज आपल्या मनात घर करून जातात, त्यातलं हे एक व्यक्तिमत्व. काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली, निराशेच्या काळोखात मी स्वतःलाही हरवून बसलो. अगदीच वाट चुकलेला वाटसरू. आपले आपले म्हणवणाऱ्या घोळक्यात कुठेतरी एकटा. अन त्यात का कोणास ठाऊक त्यांनीही माझी साथ सोडली. हसण्याच्या जागी गंभीर नजर? सारं काही समजण्या पलीकडचे. रोज सिग्नलला थांबायचो पण त्यांचा चेहरा दिवसेंदिवस गंभीर होत होता. कदाचित त्यांच्या आयुष्यातही काहीतरी घडलं असेल का? माझ्या स्वत:च्या विवंचनांच एवढ ओझं झालं होतं कि त्यांचा बाबतीत काय झालं असेल हा विचारही जड वाटत होता. त्यातच गेले आठ दिवस बेकरी बंद. मनात आल की जरा आजूबाजूला विचारून पहाव. त्यादिवशी शनिवार होता मी ठरवलं झालच तर त्यांना घरी जाऊन भेटायचं.

     चौकशी करत करत मी त्यांच्या घरी पोहचलो. बेल वाजवली. दार उघडलं गेल. त्यांनी हसत स्वागत केलं.  “ये बस” खुर्चीकडे बोट करत बोलल्या अन आत निघून गेल्या, मी बसलो अन बसल्या बसल्या घरभर एक भिरभिरती नजर टाकली. घरही तसच टापटीप, नीटनेटके, प्रसन्न. त्या पाण्याचा पेला घेऊन आल्या. पेला माझ्या हाती देऊन बाजूला असलेल्या सोफ्यात बसल्या. घोटभर पाणी पिऊन मी पेला समोरच्या टेबलावर ठेवला.

“अरे! आरामात बस आणि ते पाठीवरच ओझं उतरून ठेव” मी बॅग बाजूला काढून ठेवली.

“कश्या आहात ?"

“मी बरी आहे ! तू बोल आणि आज अचानक घरी, तसं आलास ते बरंच केलंस म्हणा मलाही तुझ्याशी बोलायचं होत, सारं काही ठीक आहे ना?” 

मला काय बोलाव सुचल नाही मग साधा मार्ग ज्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येत नाही किंबहुना द्यायचं नसत त्या प्रश्नाला प्रश्नाने उत्तरायचे.

“माझं सोडा, तुम्ही कशा आहात? नाही गेला आठवडाभर दिसला नाहीत म्हणून काळजी वाटली”

“सार काही आलबेल आहे, बाहेरगावी गेलो होतो परवाच आलो. ह्यांना प्रवासाचा त्रास झाला तब्बेत बिघडली म्हणून म्हटलं चला अजून एक दोन दिवस सुट्टी” म्हणजे एकंदर काळजी करण्याच काही नाही हे ऐकून बरं वाटलं.

“तेच ८ दिवस झाले, म्हणून चौकशीसाठी आलो.” असं बोलून मी समोरच्या पेल्यातल थोडं पाणी प्यायलो अन उठलो. त्या माझ्याकडे बघत होत्या.

“चला मग मी येतो. सर काही ठीक आहे हे ऐकून बर वाटल” असं बोलून बॅग उचलू लागलो तोच त्या बोलल्या. 

“अरे बस एवढा काय घाईत आहेस? मला हि तुझ्याशी बोलायचं अन तेही तुझ्याच बद्दल. बस जरावेळ“ त्या काहीश्या अधिकाराने बोलल्या मी आश्चर्याच्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं अन परत बसलो.

“मी अस विचारणं तुला आवडेल की नाही मला माहित नाही तरी पण विचारते. आज काल तू जरा सैरभैर झाल्यासारखा वाटतोस, काही बिनसलंय का ?” प्रश्न अगदीच अनपेक्षित होता, होकारार्थी की नकारार्थी माहित नाही पण मी कशीतरी मान हलवली. त्यांना जे समजायचं ते त्या समजून गेल्या.

“मी काही दिवसांपासून पासून तुला बघतेय तू पूर्वीसारखा नसतोस त्यामुळे मलाही तुझी चिंता वाटू लागली होती. तू आज इथे आलास अगदी योग्य केलंस. तुझं काय बिनसलंय कशामुळे बिनसलंय मला हे जाणून घेण्यात रस नाही. पण जे काही आहे त्याला तू किती दिवस कवटाळून बसशील? आणि जर वेळ हेच सगळ्या गोष्टींच उत्तर असेल तर ते चूक आहे आपल्यालाही मिळालेल्या वेळेचा उपयोग करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला नको का?”

“माफ करा पण सल्ले देणं तितकस अवघड नसतं, अवघड असतं आलेल्या दु:खाला सामोरे जाणे” त्यांच बोलणं तोडत मी फटकन बोलून गेलो.

“अगदी बरोबर आहे मित्रा” – मित्रा? त्या एका शब्दाने सारे अंतर कमी झाले अन “त्या”.. नाही “ती” अगदीच माझ्या बाकावर येऊन बसली एखाद्या मैत्रिणी प्रमाणे. आता फक्त ती बोलत होती अन मी ऐकत होतो.

“सुख आणि दु:ख म्हणजे काय असतं रे? नियतीच्या उदरातून जन्म घेतलेली जुळी भावंडं. आता मला सांग जर एकाच्या येण्याचा सोहळा केला आणि दुसरा आल्यानंतर दुर्लक्ष करून त्याला ढकललं तर नक्कीच ते चिडेल. त्याच्यात हिनत्वाची भावना उत्पन्न होते अन ते तुमच्यावर राग धरून बसते. मग जेवढे तुम्ही पळता तेवढं ते तुमचा पाठलाग करते.”

“मग.. आपण काय करायला हवं?" मी मध्येच टोकलं.

“काय करायचं? नक्कीच सुरवातीला अवघड वाटेल पण कालांतराने खूप सोपं होईल” “दु:खालाही आपलासं करायची कला अवगत कर. ते आल्यानंतर सुरवातीला धीराने अन काही काळानंतर आनंदाने त्याचा स्वीकार करायला लाग. अवघड वाटेल ...But trust me एक पाऊल टाक. पुढची वाट अपोआप दिसेल. दु:खाचा आनंदाने स्विकार कर याचा अर्थ असा नाही की दु:खातच राहा. एकदा त्याला स्वीकारलास कि तिथेच अर्ध युद्ध जिंकलं जातं. जसजसा तू दु:खाला सामोरे जाशील तसतस दु:ख छोटं होत जाईल अन त्याच्या समोर तू मोठा होशील. असं झालं की दु:ख आपण होऊन माघार घेतं. मग काय उरत सुख:च ना?

मला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं, विचार पटत होता पण त्या परिस्थितीत फार जड वाटत होता. अन का कोणास ठाऊक मनात अनेक प्रश्न उठू लागले अन मी आणखी बेचैन झालो. माझ्या अडचणी जाणून न घेता तिने उत्तर दिल का ? मी मुक्याने बसून होतो. ती बोलली

“जड जातंय? घाई नको करू कुठलाही विचार रुजायला एक वेळ लागतो आणि हो हा सल्ला नाही मी जे काही बोलले तो अनुभव होता. माझा पार्थ असता तर कमी अधिक फरकाने तुझ्या एवढाच असता” मी निशब्द. “बस, मी छान आलं टाकून चहा करते” अस बोलून ती स्वयंपाक घराकडे गेली. 

       माझ्या डोक्यात मात्र असंख्य प्रश्नांनी थैमान घातलेल. स्वतःची जखम वाहत असताना दुसर्याच्या जखमेची मलमपट्टी करण हे कुठल धैर्य. थोडं अस्वस्थ व्हायला झालं. काय कराव सुचल नाही म्हणून तडक बॅग उचलली अन घराबाहेर आलो. गाडीवर बसलो. कल्पना नव्हती कुठे चाललोय, पण माझ्या विचारांचा वेग गाडीला येत होता. ट्रॅफीक सपासप कापत मी निघालो होतो, कुठे माहित नाही. ह्या साऱ्या कल्लोळात मी तळ्याच्या काठी येऊन पोहचलो. तिथं निरव शांतता होती. संध्याकाळ रात्री कडे झुकत चालली होती. गाडी लावली अन एका दगडावर शांत बसलो. उजळणी करावी तसं पाठीमागचे काही तास मी आठवत होतो. मन बऱ्यापैकी हलकं झालं होत स्वच्छ झाल होत अन त्याचा गाभारा एका अनोख्या सुगंधाने भरून गेला होता. हा विचार खरच आपल्यात रुजेल? माहित नाही, पण तिने मला एक दिशा जरूर दिली होती एक विश्वास दिला होता. मनावरची मळभ दूर झाली होती. थोड मोकळं वाटू लागलं. विचार आला चौकशी करायला गेलो होतो अन कदाचित जीवन बदलेल असा मंत्र घेऊन आलो. घरी परतताना मी मनोमन तिचे आभार मानले अन एकच आर्जव केली ... 


तू अशीच भेटशील ? निराशेच्या अंधारात आशेचा दीप होऊन...
तू अशीच भेटशील ? भरकटलेल्या प्रवासात ओळखीची वाट होऊन...

तू अशीच भेटशील ? नि:शब्द शांततेत जाणिवांचे गीत होऊन...
तू अशीच भेटशील ? रणरणत्या दुपारी वाऱ्याची झुळूक होऊन...
तू अशीच भेटशील ? ओळखीच्या मैफिलीत हवी हवीशी अनोळखी दाद होऊन...
तू अशीच भेटशील ? नेहमी ?
  
ती अजूनही मला रोज सकाळी नजरेतून हेच विचारतो “काय मित्रा, कसं काय चाललंय?” अन मी हसून उत्तरतो “Thank you”. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती भेटावी, अगदी अनोखी....
      ___________________________________________________________________________

****पुन्हा एकदा महत्वाचे : मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा काल्पनिक आहे!! चिन्ता नसावी :) प्रवास वर्णन सोडून नव काही लिहिण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे!

      ___________________________________________________________________________



Monday, August 24, 2015

किल्ले कमळगड || Kamalgad














झिंग, मदहोशी, वेडेपणा ह्या आणि अशा तत्सम शब्दांचे खरे अर्थ समजून घ्यायचे असल्यास काय करावे.. एकच... चार साडेचार हजार फुट उंचीच्या एखाद्या डोंगर कड्यावर उभं राहून , हात लांबून (शाहरुख खान पोज ) मान आकाशा कडे उंचावून डोळे बंद करून घ्यायचे आणि ओली हवा छातीत भरत राहायचं... अगदी मन भरत नाही तोवर. अशाच काहीश्या वेडाने आम्ही काही दिवसांपासून झपाटलो आहोत आणि या वेळेस त्या वेडाने एक नवी उंची गाठली. ३००० फुट ते ३७०० फुट अन सरळ ४५०० फुट. किल्ले जीवदान नंतर बराच काळ कुठला बेत जुळून येत नव्हता पण पाठीमागच्या आठवड्यात नूतन ने ठिणगी टाकली अन हा गड तो गड करता करता बर्याच दिवसांपासून इच्छा असलेला किल्ले कमळगड सर करण्याचं ठरलं. रात्रीत प्लान झाला अन शनिवारी सकाळी तो तडीस नेला.


शनिवार २२ ऑगस्ट २०१५ , वेळ सकाळी ~७.०० आम्ही सुस्मितच्या घरापासून निघालो , कात्रजवरून सागरला घेतलं अन हायवेला पोहचलो. ह्यावेळी नेहमीप्रमाणे बाईकने न जाता कारने निघालो होतो त्यामुळे चिन्ता नव्हती. पल्ला लांबचा होता त्यामुळे जरा लवकर निघालो असतो तर बरं झालं असतं अस वाटलं पण हरकत नाही निघालो हे त्याहून महत्वाचं. कमळगड हा काही तसा फारसा प्रसिद्ध गड नाही, तुमच्यातल्या बर्याच जणांना हे नाव अगदीच नवीन असेल. पण हो कमळगड नावाचा एक गड आहे. कमळगड आणि ह्यासारखे कित्येक गड किल्ले असे आहेत कि ज्यांबद्दल आपण कधी ऐकलं नाही अन् कदाचित ** इतिहासानेही त्याची फारशी दखल घेतली नसावी. कमळगड हा महाबळेश्वर डोंगररांगे मधला एक छोटेखानी गड . ह्या गडाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण फारसं काही हाती लागलं नाही. गडाच्या पायथ्याची असणाऱ्या रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गड मुख्यत्वे टेहळणी साठी वापरण्यात येत होता याचं कारण त्याचं स्थान. हा गड आजूबाजूंच्या गडांच्या मध्यात आहे अन उंच हि आहे. त्यात पाण्याने वेढलेला. आता कमळाचं चित्र डोळ्यासमोर आलं कि लक्षात येईल कि ह्या गडाला कमळगड का म्हणतात. पण हा तर्कच, सबळ पुरावे अन माहिती उपलब्ध नाही. जाण्याचे दोन मार्ग एक नांदगणे मार्गे आणि दुसरा वासोळे मार्गे ( हि नंतर मिळालेली माहिती :P).


          तर आम्ही सागरला घेऊन कात्रजचा घाट ओलांडून हायवेला पोहचलो. थोडं पुढे आल्यावर ठरल्याप्रमाणे नाष्टा आणि गाडीची हि थोडीशी खुशामत करून वाईच्या दिशेने निघालो. बर चार चाकी असल्या करणाने चार जणांमधला एकच कामात बाकी रिकामे मग काय बर्याच जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. गम्मत आहे जुन्या आठवणी सोबत घेऊन एक नवी आठवण निर्माण करण्याचा प्रवास होता तो. एक दोन थांबे घेत आम्ही ९.४० पर्यंत वाईच्या महागणपतीला पोहचलो. दर्शन झाल्या नंतर साधारणतः १० च्या सुमारास धोमधारणाचा रस्ता पकडला. उत्तम रस्ता, मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि किशोर कुमारची गाणी आणखी काय हवं! विचारत विचारत वायगाव, वायगाव हून ११ च्या सुमारास आम्ही नांदगणेला पोहचलो. तिथं बसलेल्या गावकर्यांकडे चौकशी केली आणि त्यांच्यातल्याच एकाला वाटाड्या म्हणून बरोबर घेतलं. ते वृद्ध होते पण मला विश्वास होता कि ते व्यवस्थितपणे आम्हाला गडाचा रस्ता दाखवतील. शाळेपासून दगडूमामांना घेतलं आणि आम्ही त्यांच्या घराकडे निघालो. गाडी पार्क करून सारे सज्ज झालो. रस्ता दगडूमामांच्या घरापासूनच होता.
















 

आम्ही जिथे उभे होतो तिथून गड काही दिसत नव्हता . दगडूमामांना विचारला "मामा गड कुठाय म्हणायचा". मामानी अगदी सहज सांगितले "हे काय हे तीन चार डोंगर पार केलं कि त्या मधल्या बेचकीत". मला पूर्ण विश्वास होता कि ज्या सहजतेने ते आम्हाला सांगत होते तेवढं हे सोप्प नाही. हिय्या म्हणून चालायला सुरवात केली आणि पहिलीच टेकडी चढल्यावर आमच्यातला एक गडी खेळातून बाहेर पडण्याचा विचार करू लागला. मग सागरने नेहमीची धमकी "जर तू आला नाही तर आम्हीपण जाणार नाही” देऊन सुस्मितला पुढच्या वाटेवर ढकललं. आम्ही पुन्हा चालू लागलो. पावसामुळे बरीच वाट चिखलमय झाली होती. चिखल तुडवत चालताना अगदीच बालपणाची आठवण झाली. आई ओरडायची" अरे बाबा चिखलात खेळू नको" मग बर्याचदा माघार घ्यावी लागे. पण आता तिथ आई नव्हती अन पुन्हा लहान व्हावसं वाटलं. खर सांगायचं तर इतका सुंदर निसर्ग मी प्रथमच पाहत होतो. त्यात भर म्हणजे चहू बाजूंनी येणारे मोरांचे आवाज. अप्रतिम.



 वाट नक्कीच दम तोडणारी होती. आत्ता कुठे ५०% गड चढून झाला होता आणि पुढची वाट मलाही अशक्य वाटू लागली. हळू हळू मन सुस्मितच्या पार्टी कडे वळू लागलं पण मी आवरलं. परत हिय्या म्हणून पुढे चढू लागलो. प्रचंड मस्ती धिंगाणा फोटोग्राफी करत आम्ही चालत होतो. मधेच एका ठिकाणी विसावा घेतला. दगडू मामांबरोबरदेखील थोडी गंमत करत छानपैकी १०-१५ मिनिट टाईमपास केला. पुन्हा चालायला सुरवात केली आता मात्र गड शक्य वाटू लागला. विसाव्यामुळे? हं .. आयुष्याच पण असंच काहीसं असतं का? समोरची संकट अडचणी पाहून मन थिजतं पण जर आपण माघार नाही घेतली तर? तर काय... तर गड सर होतो. आता खरच रस्ता सुखकर वाटत होता. साधारणतः दुपारच्या २ ला गोरक्षनाथाच्या मंदिराशी येऊन पोहचलो. एव्हाना पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले होते. मंदिरात थांबलो. आणलेले डबे उघडले आणि ताव मारला. गोरक्षनाथाच्या मंदिरापासून बालेकिल्ला अगदी जवळ आहे. आपण आपल्या लक्षाच्या जवळ आल्याचा काही वेगळाच आनंद असतो.



पोटोबा झाल्यानंतर पुन्हा वाट धरली.  दाट जंगलातून वाट काढत काढत आम्ही दगडूमामाच्या मागे चालत होतो १५ -२० मिनिट चालल्यानंतर आम्ही एका मोकळ्या पटांगणात पोहचलो. इथे एक धनगरवस्ती आहे. त्यांच्या घरा शेजारी एक मोठा गाईची गोठा आहे. तिथूनच उजवीकडे गडावर जाण्याचा मार्ग आहे. इथ निळ्यारंगाची रानफुलं एका फोटोग्राफरला भुरळ घालतात. आता आम्ही गडाच्या अगदीच जवळ पोहचलो होतो पण दाट जंगल आणि धुकं ह्यामुळे गडाच दर्शन अजून झाल नव्हतं. आम्ही पुन्हा दाट जंगलात घुसलो. १५ -२० मिनिटांची पायपीट केल्यानंतर मला एकच आनंद झाला आम्ही गडाच्या प्रवेशाशी होतो. प्रवेशद्वार इतर गडांच्या सारख नाही अगदीच भग्न अवशेष म्हणता येईल. पण ते जे काही होत ते प्रचंड सुंदर होत. तिथून वर चढण्यासाठी थोडी कसरत करावी लागली. आम्ही वर आलो. वर पोहचल्या पोहोचल्या समोर एक गेरूची ४०-५० फुट खोल अप्रतिम बांधकाम असलेली विहीर पहिली आणि मन खुश झाले. विहिरीकडे वळण्या आधी थोडा गडाला फेरफटकामारला. मग मुख्य आकर्षणा कडे आलो. साधारणतः ३० पायऱ्या असतील. आत उतरलो गड सर केल्याचा आनंद झाला. खूप शांत. आख्या गडावर आम्ही चारजणच होतो. चौघेही आपापल्यापरीने त्या वातावरणात मिसळून गेला. एक तास गडावर कसा गेला कळलनाही. अंधारपडायच्या आत खाली पोहचायचे होते त्यामुळे परतीच्या वाटेला लागलो.


 उतरताना अजून एक कसरत , पूर्ण भार पंज्यावर येऊ लागल्यान पंजे दुखू लागले अन खाली बघून बघून मानही. थोडा थांबत थांबत २-२.१५ तासात आम्ही खाली पोहचलो. मी सुस्मितकडे कौतुकाने पाहत होतो. त्यान आव्हान घेतलं आणि ते पूर्ण केलं. मी त्याला बोललो “ काय कस वाटतंय” तो उत्तरला “भारी, आपण असे ट्रेक्स करत जाऊ”. बर वाटल. गाडीजवळ आलो बदलायला कपडे घेतले अन दगडूमामाच्या घरी गेलो . हात पाय धुतले कपडे बदलले. दगडूमामाच्या आग्रहास्तव घोट घोट चहा घेतला अन गाडीत येऊन बसलो. परतीचा प्रवास सुरु झाला. अंधार पडला होता. आम्ही वाईच्या दिशेन निघालो. वाईफाट्याला एका ठिकाणी चहापानासाठी थांबलो. चहा घेतल्यानंतर जरा तरतरी आली. गाडीत बसलो अन पुण्याच्या दिशेने निघालो. गाडीत बसल्यावर पुन्हा सुस्मित-नूतन बोलले “खरच अस काहीतरी आपण करत जाऊ” मी स्वताशीच हसलो. अन मला संदीप खरेची कविता आठवली.......

कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....
मनातील माकडाशी हात मिळवून आचरावे कधीतरी विचारा वाचून...
झाडापास झोंबूनिया हाती येता फळ .सहजपणे...सहजपणे...तेही फेकायला हवे ....

कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....
स्वतःला विकून काय घेशील विकत ...खरी खरी सुखे राजा मिळती फुकट...
हपापून बाजारात मागशील किती ..स्वतःतच नवे काही शोधायला हवे ....
कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....

नको बघू पाठीमागे येईल कळून .. किती तरी करायचे गेले रे राहून ...
नको करू त्रागा उद्याच्या दारात .. स्वतःलाही कधी माफ करायला हवे ...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे ...

To explore a photo story please visit : https://www.facebook.com/harshal.prabhune/media_set?set=a.10204617405095654&type=3&pnref=story

*************************************************
दंडवत , ज्यांनी ज्यांनी माझा पाठीमागचा ब्लॉग वाचला त्यांना. दंडवत ज्यांनी ज्यांनी उत्तम अभिप्राय दिले त्यांना. दंडवत ज्यांनी ज्यांनी माझे मनोबल वाढवले आणि आणखी लिखाणासाठी प्रोत्साहन दिले त्यांना. आणि नक्कीच दंडवत ज्यांनी ज्यांनी हा लेख वाचला त्यांना. Thank you 




Sunday, June 28, 2015

शिवथरघळ ....

Landscape from Vaghajai Temple    
    कोराईगाडचा ट्रेक पाठीमागाच्याच आठवड्यात पूर्ण केल्यामुळे थोडा उत्साह होताच म्हणून ह्या शनिवारी (दिनांक २७ जून १५ ) राईरेश्वरचा किल्ला सर करण्याचा बेत ठरला पण आयत्या वेळी तोफेत पाणी मित्र बोलला “यार नही होगा इस शनिवार”. त्यामुळे मी हि तलवार म्यान करून ठेवली. शनिवार लोळून घालवायचा विचार करत होतो तितक्यात शुक्रवारी रात्री सुदीपचा कॉल आला आणि बेत ठरला. जावळीच्या खोऱ्याचा वरंदघाटातून सह्याद्रीच्या कडा तुडवत शिवथरघळला जाण्याचा. वरंदघाटात जाण्याचा सुदीपचा आणि माझा योग तब्बल ६ वर्षानंतर जुळून आला. मधल्या काळात मी मात्र हा भाग मी इतका फिरलो कि मला वरंदघाटाचा कानाकोपरा माहित झाला. प्लान पक्का झाला शनिवारी सकाळी ६.३० ला वरज्यातून निघायचे.

        
शनिवारची सकाळ उजाडली सकाळी ५.३० ला सुदीप ला वेंकउप कॉल दिला आणि साधारणतः ७ वाजता आम्ही वारजे सोडल. प्रचंड आनंद झाला. यात काय विशेष प्रचंड आनंद होण्यासारखं ? हे फक्त ज्या ज्या लोकांनी सुदीप बरोबर प्रवास केला आहे त्यांला समजेल. मी ह्या फेरीला सुदीप वर खुश होतो फक्त ३० मिनिटांचा उशीर ... भन्नाट प्रगती. सुदीप गाडी चालवत होता मी पाठीमागे बसलो होतो आणि आम्ही सुसाट वेगात हायवेला लागलो. रस्तावरची जड वाहन पाहून मी एक दोनदा सुदीपला वेग कमी करण्याची निष्फळ विनंती करून नाद सोडला. चिंगाट भुंगाट वेगात कधी दरीपूल आणि बोगदा क्रॉस केला कळले नाही. शिवापूरच्या साईछाया मिसळ हाउसला मिसळ खाण्याचा विचार होता पण हॉटेल बंद होते म्हणून शेजारच्या एका हॉटेल मध्ये मिसळ-चहा-बिस्किट असा नाष्टा झाल्यावर पुढे पेट्रोल पंपवर गाडीलाहि पोटभर खाऊ दिला आणि कापूरहोळच्या दिशेने निघालो. कापूरहोळहून भोर. भोर मध्ये नदी क्रॉस करताना काही वर्षांपूर्वी कुर्डूवाडी ग्यांग बरोबर घातलेली धमाल आठवली. शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून वरंदघाटाचा रस्ता धरला.




   रस्त्यात नीरा देवघर धारणाच्या वर एका ठिकाणाहून पूर्ण पसरलेलं धरण पाहायला मिळत धरण भरायला अजून किमान १ महिन्याचा कालावधी लागेल. आत्ता मात्र पाणी तळाला गेलेलं. पण हे धरण जेव्हा भरत तेव्हा ह्या स्पॉट वरून सुंदर फोटो काढता येतात. आम्हीही तिथं थांबलो थोडा विरंगुळा केला आणि certainly काही फोटो हि काढले. या ठिकाणी सुदीप मधला फोटोग्राफर जागा झाला आणि माझा फायदा झाला. गाडीच्या किल्ल्या माझ्याकडे आल्या. धारणा पासून पुढे वरंदघाटाच्या रस्त्यावर लागणारी छोटी छोटी गाव (पाडे) आपण कोकणात जात आहोत याची जाणीव करून देतात. ह्या रस्त्या वर गाडी चालवण्याचा एक वेगळाच आनंद आहे.

   गेली आठ दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसानी आज सुट्टी घेतली होती. तरीपण मागे राहिलेल्या काही उनाड ढगांची चादर आसमंतात पसरली होती .सूर्य हि आळासावला होता मधून मधून त्यालाहि आपल्या कामाची जाणीव होत होती तेव्हा हळूच ढगांची चादर बाजूला करून तो डोकावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. आसाच पाठ-शिवणीचा खेळ खेळत आणि निसर्गाची हिरवाई डोळ्यात साठवत मी गाडी चालवत होतो. अशा सुंदर वातावरणात सारे रोजचे विचार टेन्शन ह्या पासून सुटका मिळते आणि सुरु होतो निसर्गाबरोबरचा संवाद. बराच काळ सुदीप पण शांत होता मला पाठीमागे वळून बघायची गरज नव्हती कारण मला माहित होते तोही निसर्गाशी कनेक्ट होतोय. दरी खोर्यातून वाहणारा वारा झाडांमधून वाट काढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा ह्याच प्रयत्नातून एक मधुर संगीत निर्माण होत होत . ह्या संगीताला खळखळनाऱ्या धबधब्याची आणि झाऱ्यानची साथ लागत होती आणि पक्षांनीही त्यावर ठेका धरला होता. अशा मनोरम वातावरणात वाघजाईच मंदिर जवळ येताना दिसलं.     

      वाघजाई मंदिराच्या शेजारी पवार काकूंच्या चहाच्या टपरी जवळ गाडी लावली. एक फक्कड चहा मारला आणि समोर पसरलेल्या अथांग निसर्ग सौंदर्याचा देखावा न्याहाळू लागलो. मंदिरा समोरच्या कठड्या वर उभा राहून पाहत होतो- हिरवाईन नटलेली डोंगर रांग. जिकडे बघावं तिकडे फक्त हिरवळ हिरवळ आणि हिरवळ. डोंगर माथ्यावर काही ढग विसावले होते आणि त्यात कोसळणाऱ्या दुधाळ धबधब्यानमुळे एक विहंगम दृष निर्माण झाले होते. खूप शांत. हा निसर्गाचा सोहळा पाहून खूप अभिमान वाटला कि हाच तो माझा सह्यगीरीने समृद्ध महाराष्ट्र. कॅमेऱ्याच्या शटरच्या आवाजाने मी तन्द्रीवर आलो सुदीप बाजूला उभा होता त्याच्या कॅमेऱ्यात समोरचा देखावा टिपत होता. अजून काही चहा वडापाव भजी खाऊन झाल्यावर आम्ही तिथून निघालो. पुढे एक खिंड लागते त्याच्या उजव्या बाजूला कावळा किल्ल्या कडे जाण्याचा रस्ता आहे. आम्ही तिकडे वळलो. थोडं फोटोसेशन करून किल्ल्या कडे न जाता मुख्य मार्गावर येऊन शिवथरघ कडे निघालो. 

    वळणा वळणाचा घाट संपवत माझेरी गावच्या जवळ पोहोचलो , तिथून उजव्या बाजूला एक फाटा लागतो जिथून शिवथरघळ फक्त ६ किलोमीटर आहे पण हा रस्ता कच्चा आहे. आम्ही त्या रस्त्याने जायचे ठरवले. शिवथरघळला उतरताना कसबे शिवथरचे जे काही दृष्य दिसते ते अवर्णनीय आहे. रस्ता खराब असल्याने थोडी कसरत करावी लागली पण हरकत नाही. जस गाव जवळ आल तसा गाडीला वेग आला. झाडांच्या गर्दीतून जाणारा रस्ता तुम्हाला अचानकपणे न्हेऊन ठेवतो अजस्त्र धबधब्या समोर. मंदिराच्या पायथ्याला गाडी लावली. कोसळणाऱ्या धाबदाब्या कडे आम्ही दोघे कौतुकाने पाहत होतो.

    साधारणता १०० पायऱ्या असतील , काही पायऱ्या चढल्यानंतर डाव्या हाताला गणपतीच मंदिर आहे. गणपतीच्या मूर्ती शेजारी छान विठ्ठल रूक्मींनी ची मूर्ती आहे. दर्शन घेऊन सभामंडपाकडे निघालो. प्रवेशाला डाव्या बाजूला रेसेप्शन काउंटर आणि थोड पुढे चपला ठेवण्याची व्यावस्ता. चपला काढल्या आणि शेजारी असलेल्या नळावर तोंड हातपाय धुतले. त्या जागेवरून धाबदबा आणखी रुद्र दिसतो. थोडीशी शुधा भागून मोर्चा प्रसाद(खिचडी ) वाटप जिथे चालला होता तिथे वळवला. जरी प्रसाद असला तरी दणकून खिचडी हाणली, मन तृप्त झाले. मग पुढचा कार्यक्रम. मंडपातून बाहेर पडल्यावर लगेच घळ चालू होते. घळ म्हणजे काय. पाण्याचा प्रवाहाने पाषाणात तयार झालेली गुहा. ह्या घळीला महत्व का ? कारण याच ठिकाणी सन १६५४ मध्ये रामदास स्वामींनी दासबोध ह्या ग्रंथाचे कथन केले आणि ते कल्याण स्वामींनी लिहून काढले. याचीच एक प्रतिकृती त्याठिकाणी बनवली आहे. त्या प्रतिकृती शेजारी मारुतीचे मंदिर आहे. अर्थातच जिथे रामदास स्वामी तिथे मारुतीच मंदिर हवाच. दर्शन घातले परिक्रमा केली आणि काहीकाळ तिथच विसावलो. विचार करत होतो कि त्याकाळी इथ काय वातावरण असेल. प्रचंड गूढ.

      घळीतून बाहेर धाबदाब्या शेजारी आलो. हा धबधबा फार लांबचा प्रवास करून येतो. जुलै महिन्याच्या शेवटी किवा ऑगस्ट मध्ये हा धाबदाबा इतका प्रचंड असतो कि त्याच्या आवाजाने हृदयाचे ठोके चुकतात. घळीतून बाहेर उजव्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहे वर गेल्यावर धाब्दाब्याचा आणखी सुंदर नजरा दिसतो. वर जाऊन थोडावेळ सुदीप आणि मी गप्पा मारत बसलो. आता परतीचे वेध लागले. खाली उतरलो आणि परत निघताना तिथे काही लोक रानमेवा विकत बसले होते त्यांचा कडून फणसाच्या उकडलेल्या बिया घेतल्या आणि त्या चघळत आम्ही खाली उतरलो. बऱ्याच आठवणींना कुलूप बंद करून आम्ही गाडीवर स्वार झालो. पुढ आल्यावर पुलाच्या इथे वरून वाहून आलेल्या धाबदाब्याच्या निळ्याशार पाण्याचा कुंड खुनाऊ लागला. मग म्हटलं पिक्चर अभी बाकी है दोस्त आणि गाडी बाजूला लावली. अर्धा तास तिथे पोहलो आणि मग मात्र शिवथरघळ – कुनबे शिवथरचा निरोप घेतला.

    आता मुख्य रस्त्याने परत निघालो. गाडीला वेग आला. मला घाई झाली होती कि गाडीला कोणासठाऊक. पण आत्ता रस्ता झपाझप कपात बिरवाडी – वरंद – माझेरी करत वाघजाई मातेच्या मदिराजवळ पोहचलोही. तिथे चहा घेऊन. भोर –कापूरहोळ – शिंदेवाडी – कात्रज – वारजे नॉन स्टोप आलो आणि एका सुंदर अविस्मरणीय प्रवासाला पूर्ण विराम लागला. खरतर पूर्ण विराम म्हणणं चुकीच ठरेल फार फार तर स्वल्पविराम बोलूयात. कारण सुदीपचा निरोप घेताना what next? हा प्रश्न आम्हाला पडलाच. तर किमान एक आठवडा थांबावच लागेल पुढच्या प्रवास वर्णना साठी ... Stay tuned

Wednesday, May 20, 2015

I respect...


I respect a cyclist who do not care of burning sun and moves toward destination
I respect a biker who is  riding in-search of unknown with his/her roaring bike and heavy backpack
I respect a musician who forgets seances of life and live every bit of music
I respect an artist who put smile on faces hiding his/her emotions behind a mask....
YES ...I am happy that.... I am one of them