Monday, August 24, 2015

किल्ले कमळगड || Kamalgad














झिंग, मदहोशी, वेडेपणा ह्या आणि अशा तत्सम शब्दांचे खरे अर्थ समजून घ्यायचे असल्यास काय करावे.. एकच... चार साडेचार हजार फुट उंचीच्या एखाद्या डोंगर कड्यावर उभं राहून , हात लांबून (शाहरुख खान पोज ) मान आकाशा कडे उंचावून डोळे बंद करून घ्यायचे आणि ओली हवा छातीत भरत राहायचं... अगदी मन भरत नाही तोवर. अशाच काहीश्या वेडाने आम्ही काही दिवसांपासून झपाटलो आहोत आणि या वेळेस त्या वेडाने एक नवी उंची गाठली. ३००० फुट ते ३७०० फुट अन सरळ ४५०० फुट. किल्ले जीवदान नंतर बराच काळ कुठला बेत जुळून येत नव्हता पण पाठीमागच्या आठवड्यात नूतन ने ठिणगी टाकली अन हा गड तो गड करता करता बर्याच दिवसांपासून इच्छा असलेला किल्ले कमळगड सर करण्याचं ठरलं. रात्रीत प्लान झाला अन शनिवारी सकाळी तो तडीस नेला.


शनिवार २२ ऑगस्ट २०१५ , वेळ सकाळी ~७.०० आम्ही सुस्मितच्या घरापासून निघालो , कात्रजवरून सागरला घेतलं अन हायवेला पोहचलो. ह्यावेळी नेहमीप्रमाणे बाईकने न जाता कारने निघालो होतो त्यामुळे चिन्ता नव्हती. पल्ला लांबचा होता त्यामुळे जरा लवकर निघालो असतो तर बरं झालं असतं अस वाटलं पण हरकत नाही निघालो हे त्याहून महत्वाचं. कमळगड हा काही तसा फारसा प्रसिद्ध गड नाही, तुमच्यातल्या बर्याच जणांना हे नाव अगदीच नवीन असेल. पण हो कमळगड नावाचा एक गड आहे. कमळगड आणि ह्यासारखे कित्येक गड किल्ले असे आहेत कि ज्यांबद्दल आपण कधी ऐकलं नाही अन् कदाचित ** इतिहासानेही त्याची फारशी दखल घेतली नसावी. कमळगड हा महाबळेश्वर डोंगररांगे मधला एक छोटेखानी गड . ह्या गडाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण फारसं काही हाती लागलं नाही. गडाच्या पायथ्याची असणाऱ्या रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गड मुख्यत्वे टेहळणी साठी वापरण्यात येत होता याचं कारण त्याचं स्थान. हा गड आजूबाजूंच्या गडांच्या मध्यात आहे अन उंच हि आहे. त्यात पाण्याने वेढलेला. आता कमळाचं चित्र डोळ्यासमोर आलं कि लक्षात येईल कि ह्या गडाला कमळगड का म्हणतात. पण हा तर्कच, सबळ पुरावे अन माहिती उपलब्ध नाही. जाण्याचे दोन मार्ग एक नांदगणे मार्गे आणि दुसरा वासोळे मार्गे ( हि नंतर मिळालेली माहिती :P).


          तर आम्ही सागरला घेऊन कात्रजचा घाट ओलांडून हायवेला पोहचलो. थोडं पुढे आल्यावर ठरल्याप्रमाणे नाष्टा आणि गाडीची हि थोडीशी खुशामत करून वाईच्या दिशेने निघालो. बर चार चाकी असल्या करणाने चार जणांमधला एकच कामात बाकी रिकामे मग काय बर्याच जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. गम्मत आहे जुन्या आठवणी सोबत घेऊन एक नवी आठवण निर्माण करण्याचा प्रवास होता तो. एक दोन थांबे घेत आम्ही ९.४० पर्यंत वाईच्या महागणपतीला पोहचलो. दर्शन झाल्या नंतर साधारणतः १० च्या सुमारास धोमधारणाचा रस्ता पकडला. उत्तम रस्ता, मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि किशोर कुमारची गाणी आणखी काय हवं! विचारत विचारत वायगाव, वायगाव हून ११ च्या सुमारास आम्ही नांदगणेला पोहचलो. तिथं बसलेल्या गावकर्यांकडे चौकशी केली आणि त्यांच्यातल्याच एकाला वाटाड्या म्हणून बरोबर घेतलं. ते वृद्ध होते पण मला विश्वास होता कि ते व्यवस्थितपणे आम्हाला गडाचा रस्ता दाखवतील. शाळेपासून दगडूमामांना घेतलं आणि आम्ही त्यांच्या घराकडे निघालो. गाडी पार्क करून सारे सज्ज झालो. रस्ता दगडूमामांच्या घरापासूनच होता.
















 

आम्ही जिथे उभे होतो तिथून गड काही दिसत नव्हता . दगडूमामांना विचारला "मामा गड कुठाय म्हणायचा". मामानी अगदी सहज सांगितले "हे काय हे तीन चार डोंगर पार केलं कि त्या मधल्या बेचकीत". मला पूर्ण विश्वास होता कि ज्या सहजतेने ते आम्हाला सांगत होते तेवढं हे सोप्प नाही. हिय्या म्हणून चालायला सुरवात केली आणि पहिलीच टेकडी चढल्यावर आमच्यातला एक गडी खेळातून बाहेर पडण्याचा विचार करू लागला. मग सागरने नेहमीची धमकी "जर तू आला नाही तर आम्हीपण जाणार नाही” देऊन सुस्मितला पुढच्या वाटेवर ढकललं. आम्ही पुन्हा चालू लागलो. पावसामुळे बरीच वाट चिखलमय झाली होती. चिखल तुडवत चालताना अगदीच बालपणाची आठवण झाली. आई ओरडायची" अरे बाबा चिखलात खेळू नको" मग बर्याचदा माघार घ्यावी लागे. पण आता तिथ आई नव्हती अन पुन्हा लहान व्हावसं वाटलं. खर सांगायचं तर इतका सुंदर निसर्ग मी प्रथमच पाहत होतो. त्यात भर म्हणजे चहू बाजूंनी येणारे मोरांचे आवाज. अप्रतिम.



 वाट नक्कीच दम तोडणारी होती. आत्ता कुठे ५०% गड चढून झाला होता आणि पुढची वाट मलाही अशक्य वाटू लागली. हळू हळू मन सुस्मितच्या पार्टी कडे वळू लागलं पण मी आवरलं. परत हिय्या म्हणून पुढे चढू लागलो. प्रचंड मस्ती धिंगाणा फोटोग्राफी करत आम्ही चालत होतो. मधेच एका ठिकाणी विसावा घेतला. दगडू मामांबरोबरदेखील थोडी गंमत करत छानपैकी १०-१५ मिनिट टाईमपास केला. पुन्हा चालायला सुरवात केली आता मात्र गड शक्य वाटू लागला. विसाव्यामुळे? हं .. आयुष्याच पण असंच काहीसं असतं का? समोरची संकट अडचणी पाहून मन थिजतं पण जर आपण माघार नाही घेतली तर? तर काय... तर गड सर होतो. आता खरच रस्ता सुखकर वाटत होता. साधारणतः दुपारच्या २ ला गोरक्षनाथाच्या मंदिराशी येऊन पोहचलो. एव्हाना पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले होते. मंदिरात थांबलो. आणलेले डबे उघडले आणि ताव मारला. गोरक्षनाथाच्या मंदिरापासून बालेकिल्ला अगदी जवळ आहे. आपण आपल्या लक्षाच्या जवळ आल्याचा काही वेगळाच आनंद असतो.



पोटोबा झाल्यानंतर पुन्हा वाट धरली.  दाट जंगलातून वाट काढत काढत आम्ही दगडूमामाच्या मागे चालत होतो १५ -२० मिनिट चालल्यानंतर आम्ही एका मोकळ्या पटांगणात पोहचलो. इथे एक धनगरवस्ती आहे. त्यांच्या घरा शेजारी एक मोठा गाईची गोठा आहे. तिथूनच उजवीकडे गडावर जाण्याचा मार्ग आहे. इथ निळ्यारंगाची रानफुलं एका फोटोग्राफरला भुरळ घालतात. आता आम्ही गडाच्या अगदीच जवळ पोहचलो होतो पण दाट जंगल आणि धुकं ह्यामुळे गडाच दर्शन अजून झाल नव्हतं. आम्ही पुन्हा दाट जंगलात घुसलो. १५ -२० मिनिटांची पायपीट केल्यानंतर मला एकच आनंद झाला आम्ही गडाच्या प्रवेशाशी होतो. प्रवेशद्वार इतर गडांच्या सारख नाही अगदीच भग्न अवशेष म्हणता येईल. पण ते जे काही होत ते प्रचंड सुंदर होत. तिथून वर चढण्यासाठी थोडी कसरत करावी लागली. आम्ही वर आलो. वर पोहचल्या पोहोचल्या समोर एक गेरूची ४०-५० फुट खोल अप्रतिम बांधकाम असलेली विहीर पहिली आणि मन खुश झाले. विहिरीकडे वळण्या आधी थोडा गडाला फेरफटकामारला. मग मुख्य आकर्षणा कडे आलो. साधारणतः ३० पायऱ्या असतील. आत उतरलो गड सर केल्याचा आनंद झाला. खूप शांत. आख्या गडावर आम्ही चारजणच होतो. चौघेही आपापल्यापरीने त्या वातावरणात मिसळून गेला. एक तास गडावर कसा गेला कळलनाही. अंधारपडायच्या आत खाली पोहचायचे होते त्यामुळे परतीच्या वाटेला लागलो.


 उतरताना अजून एक कसरत , पूर्ण भार पंज्यावर येऊ लागल्यान पंजे दुखू लागले अन खाली बघून बघून मानही. थोडा थांबत थांबत २-२.१५ तासात आम्ही खाली पोहचलो. मी सुस्मितकडे कौतुकाने पाहत होतो. त्यान आव्हान घेतलं आणि ते पूर्ण केलं. मी त्याला बोललो “ काय कस वाटतंय” तो उत्तरला “भारी, आपण असे ट्रेक्स करत जाऊ”. बर वाटल. गाडीजवळ आलो बदलायला कपडे घेतले अन दगडूमामाच्या घरी गेलो . हात पाय धुतले कपडे बदलले. दगडूमामाच्या आग्रहास्तव घोट घोट चहा घेतला अन गाडीत येऊन बसलो. परतीचा प्रवास सुरु झाला. अंधार पडला होता. आम्ही वाईच्या दिशेन निघालो. वाईफाट्याला एका ठिकाणी चहापानासाठी थांबलो. चहा घेतल्यानंतर जरा तरतरी आली. गाडीत बसलो अन पुण्याच्या दिशेने निघालो. गाडीत बसल्यावर पुन्हा सुस्मित-नूतन बोलले “खरच अस काहीतरी आपण करत जाऊ” मी स्वताशीच हसलो. अन मला संदीप खरेची कविता आठवली.......

कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....
मनातील माकडाशी हात मिळवून आचरावे कधीतरी विचारा वाचून...
झाडापास झोंबूनिया हाती येता फळ .सहजपणे...सहजपणे...तेही फेकायला हवे ....

कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....
स्वतःला विकून काय घेशील विकत ...खरी खरी सुखे राजा मिळती फुकट...
हपापून बाजारात मागशील किती ..स्वतःतच नवे काही शोधायला हवे ....
कधीतरी वेड्यागत वागायला हवे ....

नको बघू पाठीमागे येईल कळून .. किती तरी करायचे गेले रे राहून ...
नको करू त्रागा उद्याच्या दारात .. स्वतःलाही कधी माफ करायला हवे ...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे ...

To explore a photo story please visit : https://www.facebook.com/harshal.prabhune/media_set?set=a.10204617405095654&type=3&pnref=story

*************************************************
दंडवत , ज्यांनी ज्यांनी माझा पाठीमागचा ब्लॉग वाचला त्यांना. दंडवत ज्यांनी ज्यांनी उत्तम अभिप्राय दिले त्यांना. दंडवत ज्यांनी ज्यांनी माझे मनोबल वाढवले आणि आणखी लिखाणासाठी प्रोत्साहन दिले त्यांना. आणि नक्कीच दंडवत ज्यांनी ज्यांनी हा लेख वाचला त्यांना. Thank you 




17 comments:

  1. Wow... sounds interesting.
    I think you mentioned correctly that history did not interfere in many such Forts and places.
    You visit and presence must have definitely made the place alive, not to forget the Makad (Marathi word) of the group Sagar chopda.

    -Naj

    ReplyDelete
  2. Ek Number Harshal. Mast varnan kelas...na yeun suddha gad sar kelyacha experience aala...khupch Apratim ������������������������

    ReplyDelete
  3. Very nicely written .... तुजे प्रवास वर्णन वाचून कमळगढ ला नक्की भेट द्यावी असे वाटत आहे.....

    ReplyDelete
  4. हर्शल खूप छान लिहिलस. अप्रतिम. मला अस वाटतंय जणू काही शब्द सुद्धा तुझ्या या प्रवासवर्णनासाठी सज्ज असतात आणि आतुर होत असतील पुन्हा प्रवास रूप घेण्यासाठी.
    " गर्द झाडीतून, धैर्याने न खचता, सर कमलगड केला , आज गड तोही खुश असेल बघून मावळा हा खरा..
    हे मावळयानो नका थांबू तुम्ही आता, गड पुढचे खुणावत असतील, सर करता गड पुढचे अजूनही मावळे भेटतील "
    पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेछा आणि प्रवास वर्णनासाठी... ALL THE BEST..!!!

    ReplyDelete
    Replies
    1. हरवलेले शब्द भेटतात आजकाल कड्याकपाऱ्यात .. अन असेच भेटत राहावे . :) आभारी आहे दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल.

      Delete
  5. Apratim pravas varnan harsha.... pan ek gosht nakki sangte ki he sagla vachtana amhi ani amchyasarkhe anek jan amchyahi nakalat ya killyanchi daud karun yetat.... yapudhe suddha tuzya hatun ashi anek varnane lihili jatil hi khatri aahe mala pan tyahipeksha tuzya ya blog mule amchyasarkhe kityek pravaspremi athvaninchya jagatun, swapnanchya jagatun mast ferfatka marun yetil yacha anand jast aahe..... so yapudhe asha anek mahitit naslelya or kami prasiddhi aslelya thikanana tuzya blog var zalkaychi sandhi milo hya shubheccha.... MaithiliMangesh

    ReplyDelete
  6. प्रयत्न करेल .. कि केलेला प्रत्येक प्रवास जश्याच्या तसा तुमच्या भेटीला घेऊन येईल .. धन्यवाद

    ReplyDelete
  7. Harshya khupach chan ..kay lihtos yar..tu na chukun ya s/w madhe ghusala tusi fieldach nahiye..as bhanat likhan karat rahila tar track kharch change karshil as watatay..aani photography pan mast keliye.."kashitar as wedyagat..... mast julun aalay..ek no.

    superb improvement ..

    ReplyDelete
  8. thanks for sharing with us... I am sure it will attract few more ppl to visit this fort

    ReplyDelete
  9. "आयुष्याच पण असंच काहीसं असतं का? समोरची संकट अडचणी पाहून मन थिजतं पण जर आपण माघार नाही घेतली तर? तर काय... तर गड सर होतो.…"

    प्रवासाचे इतके सुंदर वर्णन आणि गडाची रम्य स्वारी ह्या व्यतिरिक्त आयुष्यातली खूप मोठी गोष्ट सांगितलीस हर्षल …. तुझा ब्लोग वाचताना अस वाटतं की जणू काही मी सुद्धा गडावर स्वारी करत आहे. तुमचा हा अप्रतिम अनुभव share केल्या बद्दल धन्यवाद.

    आणि असेच छान छान प्रवासाचे छान छान blogs तुझ्या कडून अनेक लोकांपर्यंत पोहोचावे हि शुभेच्छा .

    ReplyDelete
    Replies
    1. मला हि बर वाटल .. कारण लेखातील प्रत्येक वाक्य कुणाला न कुणाला त्याच्याशी relate झाली .. प्रयत्न करेल आणखी चांगलं लिहिण्याचा ..

      Delete