Tuesday, October 20, 2015

Anokhi || अनोखी....

महत्वाचे : मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा काल्पनिक आहे!!  प्रवास वर्णन सोडून नव काही लिहिण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे!
______________________________________________
        
      “मुंगी उडाली आकाशी”, “गणपतीच्या आरत्या”, "मेहंदीच्या पानावर."..अस काही सकाळी सकाळी डोळे उघडल्यावर ऐकलं की दिवसाची सुंदर सुरुवात होते. हा अनुभव लहानपणी यायचा. घरी एक फिलिप्सचा टेप रेकॉर्डर होता, खरतर त्यानच संगीत ह्या शब्दाची ओळख करून दिली. सकाळ आत्ताही तीच आहे पण पूर्वीसारखी ती भेटत नाही. लहानाचे मोठे झालो म्हणून? अगदी खरय, वपुंच्या शब्दात एकदा बालपण हरवलं कि सुरुहोतो फक्त व्यवहार. आजकालची सकाळ (व्यवहारी) उजाडते ती घडाळ्याच्या काट्यांच गणित घेऊन. माझ्यासारख्या अनेक जणांची कमी अधिक फरकाने हीच कथा आहे. उठायचं-कसंतरी आवरायचं स्वतःला कपड्यांमध्ये घालायचं अन तयार व्हायचं रोजच्या त्याच त्या सर्कशी साठी. बॅग घ्यायची जिना उतरायचा पार्किग मध्ये येऊन गाडीला फडक मारलं तर मारलं नाही तर गाडीवर स्वार होऊन घड्याळाच्या काट्या सोबत धावयाला सुरवात करायची. त्यात मी पुण्याचा म्हणजे स्वागताला “हेमामालिनी कि गालों जैसी” सडक आणि त्या रस्त्यांवरुन गाडी चालवतानाचे असंख्य अनुभव. 


     मी जसजसा पुढे जातो तसतसं जाणवतं कि गाड्यांचे लोंढ्यांचे लोंढे रस्त्यावर येतात अन रस्ता फुगत जातो. ट्राफिक जॅमला सुरवात होते. अशातच एखाद्या रिक्षाच्या पाठीमागे अडकलो तर जीव जायची पाळी. गाड्यांमधले माझे शत्रू अशी यादी जर करायची असेल तर पहिली वर्णी लागेल रिक्षाची. कसला धूर सोडतात. अस वाटते कि सायलेन्सर चा गळा दाबावा. त्यात जर त्या रिक्षाच्या पुढे जाता येत नसेल तर?. बर ह्या साऱ्या दिव्यातून पुढे निघाल्या नंतर जरा कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळतो त्यात समोर महानगर पालिकेची कचऱ्याची गाडी दिमाखात सुगंधाची उधळण करत चाललेली असते. ह्या गाडीला पास करून पुढं जावं तर एकच भीती साला वरून वरण भात किवा दह्याचा अभिषेक तर नाहीना व्हायचा.

       हि सारी अडथळ्यांची शर्यत पार करून मी माझ्या आवडत्या वळणावर येतो. गाडी चालवताना सारे सिग्नल हिरवेच लागावेत हि प्रत्येकाची माफक इच्छा , पण मला तो सिग्नल नेहमी लाल रंगातच भेटावा अन त्याने मला तिथं काही क्षणांसाठी का होईना थांबून ठेवावं असं वाटतं अन तो हि तसाच वागतो. हा परिपाठ गेल्या ६-७ वर्षांपासून चालू आहे. ते काही सेकंद बरेच काही देऊन जातात. मी नेहमी गाडी डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्नात असतो कारण मला भेटण्यासाठी तिथं कुणीतरी असतं. सिग्नलच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एक साधारणत: १२x६ ची छोटीशी बेकरी, बऱ्याच वर्षांपासून तिथच अन तशीच आहे. साधा बोर्ड, चौकटीला चिकटून लावलेलं एक काचेच काऊनटर. काचेच्या आत बरेचशे बेकरी प्रोडक्ट्स सूत्रबद्ध पद्धतीने लावलेले अगदी छोटीशी फटहि दिसणार नाही अशा पद्धतीने. काऊंटरवरची जागाही पूर्णपणे उपयोगात आणलेली. एका बाजूला ब्रेड लावलेले एका बाजूला अंड्यांचे क्रेट्स आणि एक-दोन बिस्किटांनी भरलेल्या बरण्या. मधली जागा मोकळी तिथच आत बाहेर जाण्यासाठी दरवाजा. काऊंटरच्या पाठीमागे इकडून तिकडे जाता यावं एवढी जागा तिथेच एक स्टूल ठेवलेला. त्या पाठीमागे पूर्ण काचेचं कप्प्याकप्प्यांच कपाट तेही व्यवस्थीत लावलेलं. सारं काही जिथल्या तिथं. हे सगळं पाहून कुणालाही नक्कीच वाटेल जे कोणी हे दुकान चालवत आहे त्याच्यासाठी हे फक्त पैसे मिळवून देण्याच साधन नसून त्यापलीकडे बरेच काही आहे.
  
       हे सार वर्णन ठीक आहे, पर भाई इस्टोरी का हिरो-हिरोईन किधर है? तर काऊंटरच्या मधल्या मोकळ्या फळीवर, हात टेकून थोडं झुकलेली ती मला रोज भेटायची. वय साधारणतः ५०-५५ वर्ष असाव – काय ५०-५५ वय अन तू सरळ त्यांना “ती” म्हणून एकेरी संबोधतोयस.. त्यालाही कारण आहे. तर हा वय साधारणतः ५०-५५ वर्ष असाव. गोऱ्या रंगाला आणखी उठावदार भासवणारी डोक्यावर लाल रंगाची टिकली, काळ्या केसातून मधून मधून डोकावणाऱ्या पांढऱ्या केसांच्या बटा. तांबूस काळ्या रंगांचे डोळे. उंची साधारणतः साडेपाच फुट असावी अन त्या उंचीला साजेसा बांधा. पेहरावाचं म्हणाल तर साधाच, साधी साडी व्यवस्थीत नेसलेली खांद्यावरून पदर घेतलेला. दागिने नाही पण मंगळसूत्र दिसायचे. ह्या साऱ्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य आकर्षण काय असाव तर ते हास्य. एवढ्या वर्षात ते कधीच फिकं पडल नाही, जश्याच्या तसं टवटवीत. ते हसणं म्हणजे जणूकाही निराशेच्या ढगांना छेद देणारी आशेची वीजच! त्यात भुवया उंचावून “काय कसं चाललंय?” अस मुक्यानेच विचारण्याची लकब. गेल्या ६-७ वर्षा पासून आम्ही आमची ओळख अशीच जपली आहे. कधी कधी मी हि काहीतरी घेण्यासाठी बेकरी वर जायचो त्यावेळी एकमेकांची जुजबी चौकशी व्हायची. तर अशा पद्धतीनं त्या ( आता “त्या"? हो कारण “त्या” पासून “ती” पर्यंत चा प्रवास सांगण सोपं पडेल म्हणून ) रोज मला भेटायच्या, एकमेकांची सांकेतिक चौकशी करून मी तिथून निघून जायचो. ऑफिसला.


Thanks Nidhi for beautiful sketch 


      काही व्यक्तिमत्व अशी असतात कि ती सहज आपल्या मनात घर करून जातात, त्यातलं हे एक व्यक्तिमत्व. काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली, निराशेच्या काळोखात मी स्वतःलाही हरवून बसलो. अगदीच वाट चुकलेला वाटसरू. आपले आपले म्हणवणाऱ्या घोळक्यात कुठेतरी एकटा. अन त्यात का कोणास ठाऊक त्यांनीही माझी साथ सोडली. हसण्याच्या जागी गंभीर नजर? सारं काही समजण्या पलीकडचे. रोज सिग्नलला थांबायचो पण त्यांचा चेहरा दिवसेंदिवस गंभीर होत होता. कदाचित त्यांच्या आयुष्यातही काहीतरी घडलं असेल का? माझ्या स्वत:च्या विवंचनांच एवढ ओझं झालं होतं कि त्यांचा बाबतीत काय झालं असेल हा विचारही जड वाटत होता. त्यातच गेले आठ दिवस बेकरी बंद. मनात आल की जरा आजूबाजूला विचारून पहाव. त्यादिवशी शनिवार होता मी ठरवलं झालच तर त्यांना घरी जाऊन भेटायचं.

     चौकशी करत करत मी त्यांच्या घरी पोहचलो. बेल वाजवली. दार उघडलं गेल. त्यांनी हसत स्वागत केलं.  “ये बस” खुर्चीकडे बोट करत बोलल्या अन आत निघून गेल्या, मी बसलो अन बसल्या बसल्या घरभर एक भिरभिरती नजर टाकली. घरही तसच टापटीप, नीटनेटके, प्रसन्न. त्या पाण्याचा पेला घेऊन आल्या. पेला माझ्या हाती देऊन बाजूला असलेल्या सोफ्यात बसल्या. घोटभर पाणी पिऊन मी पेला समोरच्या टेबलावर ठेवला.

“अरे! आरामात बस आणि ते पाठीवरच ओझं उतरून ठेव” मी बॅग बाजूला काढून ठेवली.

“कश्या आहात ?"

“मी बरी आहे ! तू बोल आणि आज अचानक घरी, तसं आलास ते बरंच केलंस म्हणा मलाही तुझ्याशी बोलायचं होत, सारं काही ठीक आहे ना?” 

मला काय बोलाव सुचल नाही मग साधा मार्ग ज्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येत नाही किंबहुना द्यायचं नसत त्या प्रश्नाला प्रश्नाने उत्तरायचे.

“माझं सोडा, तुम्ही कशा आहात? नाही गेला आठवडाभर दिसला नाहीत म्हणून काळजी वाटली”

“सार काही आलबेल आहे, बाहेरगावी गेलो होतो परवाच आलो. ह्यांना प्रवासाचा त्रास झाला तब्बेत बिघडली म्हणून म्हटलं चला अजून एक दोन दिवस सुट्टी” म्हणजे एकंदर काळजी करण्याच काही नाही हे ऐकून बरं वाटलं.

“तेच ८ दिवस झाले, म्हणून चौकशीसाठी आलो.” असं बोलून मी समोरच्या पेल्यातल थोडं पाणी प्यायलो अन उठलो. त्या माझ्याकडे बघत होत्या.

“चला मग मी येतो. सर काही ठीक आहे हे ऐकून बर वाटल” असं बोलून बॅग उचलू लागलो तोच त्या बोलल्या. 

“अरे बस एवढा काय घाईत आहेस? मला हि तुझ्याशी बोलायचं अन तेही तुझ्याच बद्दल. बस जरावेळ“ त्या काहीश्या अधिकाराने बोलल्या मी आश्चर्याच्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं अन परत बसलो.

“मी अस विचारणं तुला आवडेल की नाही मला माहित नाही तरी पण विचारते. आज काल तू जरा सैरभैर झाल्यासारखा वाटतोस, काही बिनसलंय का ?” प्रश्न अगदीच अनपेक्षित होता, होकारार्थी की नकारार्थी माहित नाही पण मी कशीतरी मान हलवली. त्यांना जे समजायचं ते त्या समजून गेल्या.

“मी काही दिवसांपासून पासून तुला बघतेय तू पूर्वीसारखा नसतोस त्यामुळे मलाही तुझी चिंता वाटू लागली होती. तू आज इथे आलास अगदी योग्य केलंस. तुझं काय बिनसलंय कशामुळे बिनसलंय मला हे जाणून घेण्यात रस नाही. पण जे काही आहे त्याला तू किती दिवस कवटाळून बसशील? आणि जर वेळ हेच सगळ्या गोष्टींच उत्तर असेल तर ते चूक आहे आपल्यालाही मिळालेल्या वेळेचा उपयोग करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला नको का?”

“माफ करा पण सल्ले देणं तितकस अवघड नसतं, अवघड असतं आलेल्या दु:खाला सामोरे जाणे” त्यांच बोलणं तोडत मी फटकन बोलून गेलो.

“अगदी बरोबर आहे मित्रा” – मित्रा? त्या एका शब्दाने सारे अंतर कमी झाले अन “त्या”.. नाही “ती” अगदीच माझ्या बाकावर येऊन बसली एखाद्या मैत्रिणी प्रमाणे. आता फक्त ती बोलत होती अन मी ऐकत होतो.

“सुख आणि दु:ख म्हणजे काय असतं रे? नियतीच्या उदरातून जन्म घेतलेली जुळी भावंडं. आता मला सांग जर एकाच्या येण्याचा सोहळा केला आणि दुसरा आल्यानंतर दुर्लक्ष करून त्याला ढकललं तर नक्कीच ते चिडेल. त्याच्यात हिनत्वाची भावना उत्पन्न होते अन ते तुमच्यावर राग धरून बसते. मग जेवढे तुम्ही पळता तेवढं ते तुमचा पाठलाग करते.”

“मग.. आपण काय करायला हवं?" मी मध्येच टोकलं.

“काय करायचं? नक्कीच सुरवातीला अवघड वाटेल पण कालांतराने खूप सोपं होईल” “दु:खालाही आपलासं करायची कला अवगत कर. ते आल्यानंतर सुरवातीला धीराने अन काही काळानंतर आनंदाने त्याचा स्वीकार करायला लाग. अवघड वाटेल ...But trust me एक पाऊल टाक. पुढची वाट अपोआप दिसेल. दु:खाचा आनंदाने स्विकार कर याचा अर्थ असा नाही की दु:खातच राहा. एकदा त्याला स्वीकारलास कि तिथेच अर्ध युद्ध जिंकलं जातं. जसजसा तू दु:खाला सामोरे जाशील तसतस दु:ख छोटं होत जाईल अन त्याच्या समोर तू मोठा होशील. असं झालं की दु:ख आपण होऊन माघार घेतं. मग काय उरत सुख:च ना?

मला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं, विचार पटत होता पण त्या परिस्थितीत फार जड वाटत होता. अन का कोणास ठाऊक मनात अनेक प्रश्न उठू लागले अन मी आणखी बेचैन झालो. माझ्या अडचणी जाणून न घेता तिने उत्तर दिल का ? मी मुक्याने बसून होतो. ती बोलली

“जड जातंय? घाई नको करू कुठलाही विचार रुजायला एक वेळ लागतो आणि हो हा सल्ला नाही मी जे काही बोलले तो अनुभव होता. माझा पार्थ असता तर कमी अधिक फरकाने तुझ्या एवढाच असता” मी निशब्द. “बस, मी छान आलं टाकून चहा करते” अस बोलून ती स्वयंपाक घराकडे गेली. 

       माझ्या डोक्यात मात्र असंख्य प्रश्नांनी थैमान घातलेल. स्वतःची जखम वाहत असताना दुसर्याच्या जखमेची मलमपट्टी करण हे कुठल धैर्य. थोडं अस्वस्थ व्हायला झालं. काय कराव सुचल नाही म्हणून तडक बॅग उचलली अन घराबाहेर आलो. गाडीवर बसलो. कल्पना नव्हती कुठे चाललोय, पण माझ्या विचारांचा वेग गाडीला येत होता. ट्रॅफीक सपासप कापत मी निघालो होतो, कुठे माहित नाही. ह्या साऱ्या कल्लोळात मी तळ्याच्या काठी येऊन पोहचलो. तिथं निरव शांतता होती. संध्याकाळ रात्री कडे झुकत चालली होती. गाडी लावली अन एका दगडावर शांत बसलो. उजळणी करावी तसं पाठीमागचे काही तास मी आठवत होतो. मन बऱ्यापैकी हलकं झालं होत स्वच्छ झाल होत अन त्याचा गाभारा एका अनोख्या सुगंधाने भरून गेला होता. हा विचार खरच आपल्यात रुजेल? माहित नाही, पण तिने मला एक दिशा जरूर दिली होती एक विश्वास दिला होता. मनावरची मळभ दूर झाली होती. थोड मोकळं वाटू लागलं. विचार आला चौकशी करायला गेलो होतो अन कदाचित जीवन बदलेल असा मंत्र घेऊन आलो. घरी परतताना मी मनोमन तिचे आभार मानले अन एकच आर्जव केली ... 


तू अशीच भेटशील ? निराशेच्या अंधारात आशेचा दीप होऊन...
तू अशीच भेटशील ? भरकटलेल्या प्रवासात ओळखीची वाट होऊन...

तू अशीच भेटशील ? नि:शब्द शांततेत जाणिवांचे गीत होऊन...
तू अशीच भेटशील ? रणरणत्या दुपारी वाऱ्याची झुळूक होऊन...
तू अशीच भेटशील ? ओळखीच्या मैफिलीत हवी हवीशी अनोळखी दाद होऊन...
तू अशीच भेटशील ? नेहमी ?
  
ती अजूनही मला रोज सकाळी नजरेतून हेच विचारतो “काय मित्रा, कसं काय चाललंय?” अन मी हसून उत्तरतो “Thank you”. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती भेटावी, अगदी अनोखी....
      ___________________________________________________________________________

****पुन्हा एकदा महत्वाचे : मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा काल्पनिक आहे!! चिन्ता नसावी :) प्रवास वर्णन सोडून नव काही लिहिण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे!

      ___________________________________________________________________________



4 comments:

  1. Beautiful, the way you can relate fantasy to real life is an art in itself..Keep writing :-)

    ReplyDelete
  2. भावा खर सांगतो, Goodluck च्या बाहेर बसून जेव्हा हि कथा मी व्हाचली होती, तेव्हा मला नवीन हर्शल भेटला होता..
    I was really speechless..

    ReplyDelete